राजा शिवाजी आणि मुसलमान
|| हे राज्य अवघ्यांचे | सर्व जातीपातीने ते रक्षावे ||
हे राज्य सर्वांचे
आहे, स्वराज्य नावाची
संकल्पना सर्वसामान्य जनता, बहुजन समाज यांच्या उद्धारासाठी निर्माण करण्यात
आलेली असल्यामुळे ते लोक कल्याणकारी राज्य असून त्याचे रक्षण करणे सर्वांची
जबाबदारी आहे. राजांचे राज्य हे रयतेचे राज्य, सर्वसामान्यांचे राज्य! म्हणून शिवाजी राजांचे
ब्रीदवाक्य, || हे राज्य अवघ्यांचे
| सर्व जातीपातीने ते
रक्षावे ||
शिवाजी राजांचे राज्य हे केवळ
हिंदूंचे राज्य होते, शिवाजी राजे मुस्लिमांचे कट्टर शत्रू होते, मुसलमानांचा
कर्दनकाळ होते; असा खोळसाड
अपप्रचार काही लोक स्वार्थी आणि संकुचित मानसिकतेने करीत आले आहेत आणि आजदेखील
सतत्याने करीत असतात. जर वास्तविकता शिवाजी राजे मुस्लिमांचे शत्रू असते; तर अनेक मुस्लीम
मर्द मावळ्यांनी स्वराज्यासाठी चाकरी का केली असती? शिवाजी राजांच्या सैन्यात प्राणाची बाजी लावणारे
विविध अठरापगड जाती आणि मुस्लिम धर्माचे लोक होते. शिवाजी राजांचे राज्य धर्मांध
मानसिकतेवर आधारित असते तर मुस्लीम समाजातील लोक शिवाजी राजांच्या भगव्या
झेंड्याखाली कधीच लढले नसते.
शिवाजी राजाचे
घोडदळ
सैन्यात सर्वात महत्वाचा भाग म्हणजे घोडदळ. उत्तम
प्रतीचे घोडे खरेदी करणे, त्यांची निगा राखणे आणि घोड्यांना प्रशिक्षण देणे; यासाठी महाराजांचे
स्वतंत्र खाते होते. गनिमी काव्याची सारी भिस्त या घोडदळावरच! यावरून अंदाज येऊ
शकतो हे खाते किती महत्वाचे! या घोडदळाचा प्रमुख मोहम्मद सैस, एक मुसलमान! हो तेच
मुसलमान ज्यांच्या देशप्रेमावर तुम्हाला शंका आहे. तेच मुसलमान ज्यांच्या विरोधाचे
राजकारण म्हणजे हमखास सत्ताप्राप्ती! हो तेच मुसलमान जे लांडे म्हणून हिणविले
जातात.
घोडदळाला प्रशिक्षित करण्याची जबाबदारी याच
मुसलमानांच्या पुत्र मोहम्मद सैसकडे होती. याच मोहम्मद सैसने संभाजी राजाला
घोडस्वारीचे प्रशिक्षण देऊन घोडस्वारीत तरबेज केले होते. याच मोहम्मद सैसमुळे
मराठ्यांचे घोडे स्वराज्य स्थापनेकरीता दौडू शकले. आजही असे कित्येक मोहम्मद सैस
मुस्लीम समाजात आहेत, जे मानवतेसाठी सर्वकाही अर्पण करू शकतात. भारतरत्न ए.
पी. जे. अब्दुल कलाम हे त्यातीलच एक! गरज आहे केवळ शिवाजी राजांच्या पारखी नजरेची, आहे का कोणी मावळा
असा जो राजा शिवाजी राजांच्या नजरेनं मुस्लीम समाजाकडे पाहील?
शिवाजी राजाचे आरमार
शिवाजी राजांच्या आरमाराचे सर्व प्रमुख मुसलमान होते.
त्यापैकी दर्यासारंग आणि दौलतखान यांचे नाव इतिहासकार आजही आदराने घेतात. या दोघा
मर्द मुस्लिमांनी मिळून इंग्रजांना अरबी समुद्राचे पाणी पाजले आणि स्वराज्याच्या
नौदलाचा दबदबा निर्माण केला. या दोघांव्यतिरिक्त इब्राहीम खान, सुलतान खान, दाउद खानसारखे
नावाजलेले एकापेक्षा एक श्रेष्ठ नौदल प्रमुख मुस्लीम समाजाने राजा शिवाजींना दिले.
या नौदल प्रमुखांनी इंग्रजांच्या पाच अजस्त्र जहाजांना समुद्राचा तळ दाखवून
इंग्रजांच्या काळजाचे पाणीपाणी केले. इंग्रजांचे डोव्हर नावाचे जहाज जिंकून त्यावर
स्वराज्याचे निशाण अभिमानाने फडकाविले. जेव्हा हिंदूंसाठी समुद्रप्रवास निषिद्ध
होता तेव्हा समुद्राच्या छातीवर उभे राहून स्वराज्याच्या रक्षणासाठी आमच्या
जिवाचीही परवा न करणारे आम्हीच मुसलमान होतो; ज्यांना तुम्ही आज दहशतवादी आणि देशद्रोही सारखी
दुषणे लावता. अरे आलमगीर औरंगजेबांच्या विरुद्ध लढताना राजा शिवाजींनी कधी खासगीत
तरी मुस्लिमांच्या प्रामाणिकतेवर संशय घेतल्याचा एकतरी पुरावा दाखवा. नसेल तर मग
कोण्या एक दहशतवाद्यामुळे समस्त मुस्लीम समाजाला संशयाचा दृष्टीने का पाहता? हा कोणाचा आदर्श
पाळता? राजा शिवाजींचा
म्हणण्याची तर हिम्मत करूच नका.
शिवाजी राजाचे तोफखाना प्रमुख
जेव्हा स्वराज्याचा व्याप वाढू लागला, तेव्हा गडकोटावर
तोफा पेरल्या जाऊ लागल्या. त्यावेळी शिवाजी राजांनी आपला तोफखाना ज्याच्या ताब्यात
दिला ते इब्राहीम खान मुसलमानच होते. शिवाय शिवाजी राजांच्या सर्वच तोफखान्यांचे
प्रमुख मुसलमान होते. तोफखाना म्हणजे राजा शिवाजींचे सामर्थ्यस्थळ. युद्धात हा
तोफाखानच निर्णायक भूमिका बजावत असे. अश्या महत्वाच्या स्थळी शिवाजी राजांनी
मुस्लिमांची वर्णी लावली होती. (पानिपत १७६१च्या लढ्यात देखील मराठ्यांचा तोफखाना
प्रमुख इब्राहीम खान गारदी नावाचा एक मुसलमानच होता! सदाशिव भाऊचे प्राण वाचविताना
त्यास वीरगती प्राप्त झाली.)
शिवाजी राजांनी मुस्लीम समाजाला केवळ लष्करातच सहभागी
केले असे नाही तर अत्यंत महत्वाची पदे देखील देऊ केली; अभूतपूर्व असा
विश्वास टाकला मुस्लीम समाजावर आणि मुस्लीम समाजाने तो विश्वास सार्थ करून
दाखविला. शिवाजी राजांच्या सैन्यात जितके स्वकीय मुस्लीम होते तितकेच किंवा
संख्येने अधिक परकीय मुस्लीमदेखील होते. सिद्दी हिलाल, सिद्दी इब्राहिम, सिद्दी वाहवाह हे
सर्व परकीय मुस्लिम, यमनहून आलेले. (यावर कधी सविस्तर प्रकाश टाकतो)
स्वराज्यातील एकही मुस्लीम मावळा असा नाही ज्याने शिवाजींशी विश्वासघात केला
असावा. असेल तर दाखवा पुरावा...!
शिवाजी राजाचे प्रशासन
शिवाजी राजांनी मुस्लिमांना केवळ लष्करातच सहभागी
केले असे नाही तर प्रशासनात देखील सहभागी करून घेतले. स्वराज्याचा सर्व गुप्त
व्यवहार आणि परराष्ट्र विषयक कारभार सांभाळण्याची विश्वसनीय कामगिरी अरबी व फारसी
भाषेत निष्णांत असणाऱ्या मौलाना काजी हैदर या मुस्लीम धर्मगुरुवर सोपविली. शिवाजी
राजांची राजमुद्रादेखील त्यांच्याच स्वाधीन करण्यात आली. ही काही साधारण बाब
नव्हे! गुप्त व्यवहार आणि परराष्ट्र विषयक खाते म्हणजे स्वराज्याची सर्व
शक्तीस्थळे आणि मर्मस्थळे याची माहिती असणारे खाते. इतक्या महत्वाच्या खाती एक
मुस्लीम मौलानाच्या हाती देण्याचे काम राजांनी करून दाखविले. याचे गांभीर्य एक
सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित व्यक्तीच समजू शकतो. मुस्लीम व्यक्ती, तोही धर्मपरायण
मुस्लीम व्यक्ती विश्वासघात करणारच नाही याचा किती भयंकर विश्वास राजांना! हा
विश्वास सार्थच ठरला.
राजांच्या विश्वासाचे चीज करणाऱ्या मौलाना काजी
हैदरवर राजांनी आणखीन एक महत्वाची जबाबदारी सोपविली. ती म्हणजे स्वराज्याचा सर
न्यायाधीश होण्याची! होय, स्वराज्याचा पहिला सरन्यायाधीश होण्याचा मान एका
मुस्लीम व्यक्तीस मिळाला, ही आमच्यासाठी गर्वाचीच बाब! इतका इतिहास समोर असूनही
मुस्लीम द्वेषी राजकारणाला कसे बळी पडता तुम्ही? कोणी दिली ही शिकवण तुम्हास?
शिवाजी राजांची मशीद
शिवाजी राजांच्या सेवेत असंख्य मुस्लीम व्यवस्थापकीय, प्रशासकीय आणि
लष्करी सेवेत होते. म्हणूनच त्यांच्यासाठी स्वराज्याच्या संसदेच्या, रायगडाच्या
प्रांगणात शिवाजी राजांनी मशीद बांधली आणि आज मशीद पाडणारे आम्ही राजांचे सैनिक
आहोत म्हणतात! हा शिवाजी राजांचा वैचारिक खून कधीपर्यंत सहन केला जाणार? मशिदीत जर
देशद्रोहाची आणि दहशतवादाची शिकवण दिली जात होती तर राजांनी मशीद का बांधली? वास्तवाचे ज्ञान
तुम्हास जास्त आहे की शिवाजी राजांना? तुम्हास मशिदीबद्दल संशय असल्यास द्या ना एखाद्या
मशिदीस भेट आणि करा ना शहानिशा.
शिवाजी राजांची सुरक्षा
स्वराज्यासाठी काम करणारा एकही मुस्लीम कधी बेईमान
झाला नाही. म्हणून राजांच्या विश्वासाला सर्वात जास्त हाच समाज पत्र ठरला.
महाराजांचे ३१ पैकी २० अंगरक्षक मुस्लीम होते (म्हणजेच ६४.५%)! सिद्दी हिलाल, सिद्दी इब्राहीम
आणि फराश मदरशहा (मदारी) तर सावलीप्रमाणे राजांच्या सोबत असायचे. मदारीच्या
मृत्यूसमयी धाय मोकलून रडणारा शिवाजी राजा रायगडाने याची देही याची डोळा पहिला.
अफजलखान भेटीच्या वेळी राजांच्या सोबत असणारा विश्वासू मावळा म्हणजे सिद्दी
इब्राहीम. राजांच्या अत्यंत महत्वाच्या गाठीभेटी, चर्चात सिद्दी इब्राहिमचा सहभाग असायचा. आज तुम्हास
का नाही मुस्लीम समाजावर विश्वास? स्वत:लाच विचारा हा प्रश्न. हाच का तुमचा मुस्लीम
समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन? आज शिवाजी राजे असते तर....
समारोप
पन्हाळगडाच्या वेढ्यात सिद्दी हिलालने आपल्या
पुत्रासह शिवाजी राजाच्या रक्षणार्थ प्राणाची बाजी लावली. राज्याभिषेकाला
स्वकीयांकडूनच विरोध होत असताना मौलाना काजी हैदर, नूरखान बेग, सिद्दी इब्राहीम, सिद्दी हिलाल, सिद्दी वाहवाह, मदार फाराशहा (मदारी), खान मियाना, दर्या सारंग, दौलत खान, दाउद खान, हुसेन खान मियाना, सुलतान खान आणि मोहम्मद सैस सारखा स्वकीय आणि परकीय
मुस्लीमांनी राजांना साथ दिली. शिवाजी राजे व्हाहेत हेच स्वपन उराशी बाळगून
त्यांनी प्रामाणिकपणे चाकरी केली. वेळप्रसंगी आपले रक्त सांडून स्वराज्याचे पीक
पिकवली. आजही असे असंख्य मुस्लीम मानवतेसाठी आपल्या जीवाचे बलिदान देत आहेत, देऊ शकतात आणि
भविष्यातही देतील. गरज आहे केवळ शिवाजी राज्याचा दृष्टीकोनाची.......!
No comments:
Post a Comment
Thanks For Ur Comment